आमच्या वर्गाची सहल
‘सहल’ हा शाळेतील विदयार्थ्यांना हवाहवासा वाटणारा कार्यक्रम असतो. यंदा आमच्या वर्गातील सहलीला एक वेगळेच महत्त्व आले होते; कारण नुकतीच वर्गात श्री. ना. पेंडसे यांच्या ‘हद्दपार’ कादंबरीतील राजेमास्तरांनी काढलेल्या वर्गसहलीची हकीकत आम्ही वाचली होती. ती सहल आम्हांला आदर्शवत् वाटत होती. त्यामुळे सहलीचे बेत आखताना आम्ही रंगात आलो होतो.
या सहलीमध्ये वर्गातील सर्वांनी सहभागी व्हायचेच असे आम्ही ठरवले होते. कोंडिबा शिपायाचा सुरेश आमच्याच वर्गातला. पैशाअभावी तो सहलीला येण्याचे टाळत होता; पण आम्ही त्याची सहलीची वर्गणी भरून, आग्रह करून त्याला बरोबर घेतलेच.
खास ठरवलेल्या आरक्षित एस्. टी. ने आम्ही शिवनेरी गडावर आलो. आमचे सर या गडावर अधूनमधून जातात, म्हणून येथील प्रत्येक स्थळाची त्यांना बारकाईने माहिती आहे. गडावरून फिरताना सरांनी प्रत्येक ठिकाणाचे असे काही वर्णन केले की, शिवरायाचा जन्म आणि शिवरायाचे गडावरील बालपण सारे आमच्यासमोर जणू साकार झाले. गड हिंडून झाल्यामुळे आता खूप भूक लागली होती. सरांनी गडावरच सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. गरम गरम झुणका-भाकर, बरोबर कांदा आणि लोणचे आणि नंतर मस्त दहिभात. किती लज्जत होती बरे त्या जेवणाला ! खास मातीच्या भांड्यात लावलेले दही ही त्या गडावरची खासियत होती म्हणे!
गडावर आम्ही एकमेकांशी गमतीने ऐतिहासिक भाषेत बोलत होतो. भोजन झाल्यावर करमणुकीचे कार्यक्रम झाले. त्यांत सुरेशने म्हटलेला पोवाडा ऐकून तर आम्ही सर्वजण चकितच झालो. सुरेशच्या या गुणाची आम्हांला नव्याने ओळख झाली. मग परतीच्या प्रवासात सुरेशची गाणी ऐकण्याचा कार्यक्रम रंगला होता. शिवनेरीच्या सहवासातील अनेक ऐतिहासिक स्थळे आजही माझ्या डोळ्यांसमोर उभी राहतात