१. क्षेत्रभेट
थोडक्यात उत्तरे द्या.
(अ) तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा.
उत्तर : क्षेत्रभेटीचा अहवाल पुढील मुद्द्यांच्या आधारे तयार करू: १. क्षेत्रभेट
(१) प्रस्तावना.
(२) क्षेत्रभेटीचे महत्त्व व उद्दिष्टे.
(३) संबंधित क्षेत्रातील प्राकृतिक रचना, नदया, तलाव, हवामान, पर्जन्यमान, उद्योग, पिके, प्राणी, वनस्पती, घरे व घरांची रचना, वाहतुकीच्या सोयी, लोकसंख्या, लोकांचा आहार, पोशाख, संस्कृती इत्यादी बाबींविषयीच्या माहितीचे संकलन व माहितीचे चित्रांच्या, छायाचित्रांच्या, तक्त्यांच्या, आलेखांच्या साहाय्याने सादरीकरण.
(४) निष्कर्ष, आभार प्रदर्शन व संदर्भसूची.
(आ) कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा.
उत्तर : कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली :
(१) या कारखान्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
(२) कारखान्यात कोणकोणत्या वस्तूंचे उत्पादन होते?
(३) कारखान्यात कार्यरत असणाऱ्या कामगारांची एकूण संख्या किती ?
(४) कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी कोणत्या कच्च्या मालाची आवश्यकता असते ?
(५) कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल कोणत्या ठिकाणाहून आणला जातो ?
(६) कारखान्यात उत्पादित झालेला पक्का माल कोणत्या ठिकाणी विक्रीस पाठवला जातो ?
(७) कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणती खबरदारी घेतली जाते ?
(८) पर्यावरणास हानी होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात ?
(इ) क्षेत्रभेटीदरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल?
उत्तर : क्षेत्रभेटीदरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन पुढील प्रकारे करू:.
(१) क्षेत्रातील पडलेला कचरा संकलित करण्यासाठी मोठ्या आकाराच्या गोणी व पिशव्या बरोबर नेऊ..
(२) क्षेत्रभेटीदरम्यान क्षेत्रभेटीत सामील झालेल्या व्यक्तींकडून कचरा पसरणार नाही याची खबरदारी घेऊ. त्यासाठी क्षेत्रभेटीदरम्यान वापरलेल्या कागदी पिशव्या, ताटल्या, खादयपदार्थांची वेष्टने, उरलेले खादयपदार्थ इत्यादी एकत्र जमा करू.
(३) संबंधित क्षेत्रात माहिती फलक, पथनाट्ये, सूचना फलक इत्यादी साधनांद्वारे स्वच्छतेविषयी जाणीव-जागृती वाढवू.
(४) संबंधित क्षेत्रातील कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी संबंधित क्षेत्रातील शासकीय अधिकाऱ्यांशी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार पत्राद्वारे/मुलाखतीद्वारे संपर्क साधू.
(ई) क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल?
उत्तर : क्षेत्रभेटीसाठी आम्ही पुढील साहित्य घेऊ : (१) माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, कॅमेरा, दुर्बीण इत्यादी.
(२) स्थानाच्या दिशा निश्चितीसाठी होकायंत्र व सखोल अभ्यासासाठी नकाशे.
(३) क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार माहिती संकलनासाठी नमुना प्रश्नावली. (४) क्षेत्रातील पाण्याचे, मातीचे, कचऱ्याचे, वनस्पतींचे, दगडांचे नमुने गोळा करण्यासाठी कागदी पिशवी अथवा बंद झाकणाचे डबे. याशिवाय, टोपी, पाण्याची बाटली, प्रथमोपचार पेटी इत्यादी.
(उ) क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा.
उत्तर : क्षेत्रभेटीची आवश्यकता पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते : (१) क्षेत्रभेटीद्वारे भौगोलिक संकल्पनांचा, घटकांचा व प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो.
(२) क्षेत्रभेटोद्वारे मानव व पर्यावरण यांतील सहसंबंध जाणून घेता येतो.
(३) क्षेत्रभेटीद्वारे क्षेत्रभेटीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील सामाजिक,
आर्थिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परिस्थितींचा अभ्यास करता येतो. (४) क्षेत्रभेटीद्वारे भूगोलाचा अभ्यास अधिक रंजक होतो व अभ्यासलेल्या ज्ञानाच्या उपयोजनास चालना मिळते.