एक निसर्गरम्य स्थान- महाबळेश्वर वर्णनात्मक मराठी निबंध। Yek Nisargramya Sthan-Mahabaleshwar Essay

एक निसर्गरम्य स्थान- महाबळेश्वर वर्णनात्मक मराठी निबंध । Yek Nisargramya Sthan-Mahabaleshwar Essay । Mahabaleshwar Nibandh in Marathi

एक निसर्गरम्य स्थान- महाबळेश्वर वर्णनात्मक मराठी निबंध। Yek Nisargramya Sthan-Mahabaleshwar Essay

मामाची नवी गाडी महाबळेश्वरचा घाट चढत होती आणि फार दिवसांची माझी इच्छा पूर्ण होत होती. घाट चढताना आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर पाहून मी पार हरवून गेलो होतो. किती पाहावे आणि कुठे कुठे पाहावे असे मला झाले होते. रस्ता वळणावळणांचा होता. थोडे पुढे गेल्यावर मागचा नागमोडी रस्ता विलोभनीय दिसत होता. आपण किती झपकन वर चढून आलो, याचा अंदाजही येत होता. पुढे पुढे तर सर्व रस्ता गर्द झाडीने झाकोळला होता. मध्येच एक सुंदर ठिकाण लागले. क्षणभर वाटले, आले वाटते महाबळेश्वर, पण छे ! ती पाचगणी होती. गाडीच्या आवाजावरून चढ लक्षात येत होता. गाडीचा वेग मंदावला होता. मध्येच एखादी खोल दरी नजरेत भरत होती आणि अंगावर शहारे आणत होती. अंगाला गार वारे झोंबू लागले तेव्हा लक्षात आले की, आपण महाबळेश्वरला येऊन पोचलो आहोत.

महाबळेश्वर हे श्रीमंतांचे विश्रांतीचे व गरिबांचे पोट भरण्याचे ठिकाण आहे. धनिकांचे सुंदर बंगले व धनिकांसाठी बांधलेली आलिशान आहारगृहे, विश्रांतिस्थाने यांची तेथे नुसती रेलचेल आहे. या धनिकांच्या चैनीसाठी तेथे गरीब राब राब राबतात आणि आपले पोट भरतात. समाजाच्या दोन वर्गांतील ही विषमता येथे विशेषत्वाने जाणवते. पण येथील सदाबहार निसर्गाजवळ मात्र तसा भेदभाव नाही. तो गरिबांच्या झोपड्यांवर आणि श्रीमंतांच्या बंगल्यांवर, दोन्हीवरही मुक्तहस्ताने आपले वैभव उधळत असतो.

महाबळेश्वरच्या मुक्कामात प्रथम आम्ही ‘मुंबई पॉइंट’ पाहायला गेलो, कारण तेथून सूर्यास्ताची आगळी शोभा दिसते. या पॉइंटवरून खाली उतारावर इतकी सुंदर हिरवळ दिसत होती की, जणू काही परत निघालेल्या भास्करासाठी कुणी तरी हा हिरवागार गालिचाच पसरला आहे, असे वाटत होते. कुणी म्हणतात, मुंबई पॉइंटवरून मुंबईचा समुद्र दिसतो, पण मला मात्र येथून दिसला तो अथांग पसरलेला हिरवागार सागर.

रात्री तेथील एका ‘हॉलिडे कॅम्प ‘मध्ये आम्ही मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी आम्ही ऑर्थर सीट, एल्फिन्स्टन पॉइंट, लॉडविक पॉइंट पाहिले. त्या ठिकाणांहून दिसणाऱ्या भव्य, दिव्य निसर्गाच्या दर्शनाने क्षणकाल माझे देहभान हरपले. त्या निवांत निसर्गरम्य ठिकाणी मला निसर्गाच्या दिव्यत्वाचा साक्षात्कार झाला. मनाच्या प्रसन्न अवस्थेतच आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी परतलो..

Print Friendly, PDF & Email
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.