मी वाचवतोय स्वाध्याय | mi vachavtoy swadhyay | class 9 | iyatta navvi | ९ वी मराठी स्वाध्याय
प्र. १. कोष्टक पूर्ण करा.
पूर्वीचे व्यवसाय | पूर्वीचे खेळ |
(१) लोहारकाम | (१) विटीदांडू |
(२) कुंभार ( मडकी बनविणे ) | (२) लगोरी |
(३) भांड्यांना कल्हई करणे | (३) आट्यापाट्या |
प्र. २. आकृती पूर्ण करा.
मनोरंजनाचे घटक |
आजचे स्वरूप. कालचे स्वरूप
दूरदर्शनावर क्रिकेट मॅच पाहणे. विटीदांडू, लगोऱ्या, आट्यापाट्या पिंगा असे मातीतले खेळ
आणि क्राईम थ्रिलर पाहणे.
प्र. ३. सकारण लिहा.
जुन्या गोष्टींपैकी वाचवाव्या वाटणाऱ्या गोष्टी
तुमच्या मते त्या गोष्टी वाचवण्याची कारण
उत्तर –
जुन्या गोष्टींपैकी वाचवाव्या वाटणाऱ्या गोष्टी | तुमच्या मते त्या गोष्टी वाचवण्याची कारण |
(१) कविता | (१) मान समुद्ध होते |
(२) आई | (२) प्रेम, माया, जिव्हाळा लाभतो |
(३) बोली | (३) विचार व्यक्त करता येतात |
(४) भूमी | (४) मूल्यांवर निष्ठा असते |
प्र. ४. काव्यसौंदर्य.
(अ) तुम्हांला जाणवलेली कवीच्या मनातील खंत स्पष्ट करा.
उत्तर : जुन्या जमान्यातील काही चांगल्या गोष्टी हरवत व दुरावत चालल्या आहेत, यांची खंत कवीला वाटते. बदलत चाललेल्या समाजातील वास्तव कवीच्या मनाला खटकते. आपण आईला ‘आई’ अशी साद घालत नाही. वासरासाठी गोठ्यात गायही हंबरत नाही. मॉलच्या नवीन झगमगीत संस्कृतीमुळे किराणा व भुसार हरवत चाललेयत. गावगाड्यातील व्यवसाय लोप पावतायत. मुले मातीतले खेळ खेळत नाहीत. कुणी लेखन करीत नाही. मातृभाषेत कुणी या भूमीतली संस्कृती जपत नाही. अशा प्रकारे सांस्कृतिक वैभव नष्ट होण्याची खंत कवीला बोचते आहे.
(आ) ‘शब्द बापुडे केवळ वारा’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य शब्दबद्ध करा.
उत्तर : पूर्वीच्या कविता किंवा साहित्य उच्च सांस्कृतिक मूल्य अपणारे होते. जीवनानुभूतीतून आदर्श व प्रेरणा जनमानसाला मिळत होत्या. परंतु आता लिहिणाऱ्या हातातून सकस साहित्यनिर्मिती होत नाही, हे कवीला सांगायचे आहे. जो शब्दपसारा दिसतो तो भावनाशून्य व्व पोकळ आहे, असे कवीला म्हणायचे आहे. शाश्वत राहणारे अभिजात साहित्य निर्माण होत नाही, याची खंत व्यक्त करताना कवी म्हणतात की, आताचे शब्द केविलवाणे झाले आहेत व ते वाऱ्यावर विरून जात आहेत. आता लिहिल्या जाणाऱ्या शब्दांची नश्वरता व तात्कालिकता कवीला या ओळीतून सांगायची आहे.
(इ) सामाजिक बदलांबाबत कवितेतून व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा.
उत्तर – पूर्वी गावगाडा होता. नैतिक मूल्ये जपणारी गावची संस्कृती होती. हळूहळू समाज बदलत गेला. शहरे वाढू लागली. सगळ्या वस्तू झगमगीत मॉलमध्ये, सुपरमार्केटमध्ये मिळू लागल्या. त्यामुळे छोटी छोटी किराणा, भुसार मालाची दुकाने हरवून गेली. लोहाराचा भाता बंद पडला. कुंभाराचे चाक फिरायचे थांबले. तांब्या-पितळेच्या भांड्यांचा वापर लयाला गेल्यामुळे कल्हईची झिलई निघून गेली. चुलीची जागा गॅसच्या शेगड्यांनी घेतली. आधुनिक समाजव्यवहारांमुळे मायेची माणसे दुरावली. अशा प्रकारे या कवितेत सामाजिक बदलाविषयी कवीने सांगितले आहे.
प्र. ५. स्वमत.
(अ) ‘माझी बोली’ या संकल्पनेतून तुम्हांला समजलेला कवीचा दृष्टिकोन स्वभाषेत मांडा.
उत्तर : ‘माझी बोली’ म्हणजे मायबोली किंवा मातृभाषा होय. • वेगाने बदलत जाणाऱ्या समाजात जी नवीन पिढी शिकते आहे; त्यांच्यावर शिशुवर्गापासूनच इंग्रजीचे संस्कार होत आहे. पूर्वीचे घरचे मराठमोळे वातावरण झपाट्याने बदलत आहे. आधुनिकीकरणामुळे नवीन पिढीच्या तोंडी इंग्रजी रुळत जाते आहे. आईची जागा ‘मम्मी’ने घेतली आहे. मातृभाषेतून दिले जाणारे शिक्षण हळूहळू मंदावत आहे. मातृभाषा हेच विचार व भावना मांडण्याचे नैसर्गिक माध्यम असते. ते माध्यम बंद पडत चालल्यामुळे कवीने खंत व्यक्त केली आहे. अशा प्रकारे ‘माझी बोली’ या संकल्पनेतून कवींची खेदजनक भावना व्यक्त झाली आहे.
(आ) ‘मॉलच्या अतिक्रमणामुळे छोट्या दुकानदारांना फटका बसतो’ याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर : शहरे वाढली तसतसे लोकांच्या गरजा पुरवणारे ‘मॉल’ वाढले. पूर्वी शहरामध्येसुद्धा छोटे छोटे दुकानदार होते. विशिष्ट प्रकारच्या वस्तू विशिष्ट दुकानांत मिळायच्या. मॉलमध्ये सर्व वस्तूंची दुकाने एकत्र असतात, शिवाय खादयपान सेवेची हॉटेल्स व सिनेमागृहेही असतात. मॉलच्या एकंदर झगमगाटाचे आकर्षण माणसांच्या ठायी निर्माण झाले. महागड्या वस्तू म्हणजे दर्जेदार वस्तू असा गैरसमज फोफावला. त्यातच आकर्षक जाहिरातींची भर पडल्यामुळे लोकांना मॉलचे आकर्षण निर्माण झाले. साहजिकच माणसांचा मॉलमध्ये राबता सुरू झाला आणि त्यांनी छोट्या दुकानांकडे पाठ फिरवली. अर्थात मॉलच्या अतिक्रमणामुळे छोट्या दुकानदारांना फटका बसतो, हे खरे आहे.