६. लोकसंख्या
प्रश्न १. खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा. चुकीची विधाने दुरुस्त करा.
(अ) भारतापेक्षा ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे.
उत्तर – बरोबर
(आ) ब्राझीलमधील लोक ईशान्य भागापेक्षा आग्नेय भागात राहणेजास्त पसंत करतात.
उत्तर – बरोबर
(इ)भारतातील लोकांचेआयुर्मान कमी होत आहे.
उत्तर – चूक
(ई) भारताच्या वायव्य भागात दाट लोकवस्ती आहे.
उत्तर – चूक
(उ) ब्राझीलच्या पश्चिम भागात दाट लोकवस्ती आहे.
उत्तर – चूक
प्रश्न २. दिलेल्या सुचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा.
६. लोकसंख्या
(अ) भारतातील खालील राज्यांची नावेलोकसंख्येच्या वितरणानुसार उतरत्या क्रमाने लिहा.
हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश.
उत्तर – उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश,हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश
(आ) ब्राझीलमधील खालील राज्यांची नावेलोकसंख्येच्या वितरणानुसार चढत्या क्रमाने लिहा.
ॲमेझॉनस, रिओ दी जनेरीओ, अलाग्वास, , पॅराना, सावो पावलो, रिओ दी जनेरीओ
उत्तर – ॲमेझॉनस, अलाग्वास, पॅराना , सावो पावलो, रिओ दी जनेरीओ
(इ) लोकसंख्येवर परिणाम करणाऱ्या पुढील घटकांचे अनुकूल व प्रतिकूल अशा गटांत वर्गीकरण करा.
सागरी सान्निध्य, रस्त्याची कमतरता, समशीतोष्ण हवामान, उद्योगधंद्यांची उणीव, नवीन शहरे आणि नगरे, उष्ण कटिबंधीय आर्द्र वने,खनिजे, निमशुष्क हवामान, शेतीस उपयुक्त जमीन.
उत्तर : (अ) लोकसंख्येवर परिणाम करणारे अनुकूल घटक – सागरी सान्निध्य, समशीतोष्ण हवामान, नवीन शहरे आणि नगरे, खनिजे, शेतीस उपयुक्त जमीन.
(ब) लोकसंख्येवर परिणाम करणारे प्रतिकूल घटक : रस्त्यांची कमतरता, उद्योगधंदयांची उणीव, उष्ण कटिबंधीय आर्द्र वने, निम-शुष्क हवामान.
प्रश्न ३. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) भारत व ब्राझील या देशांच्या लोकसंख्या वितरणातील साम्य व फरक स्पष्ट करा.
उत्तर – (अ) भारत व ब्राझील या देशांच्या लोकसंख्या वितरणातील साम्य:
(१) दोन्ही देशांच्या अतिउत्तर, मध्य व वायव्य भागात लोकसंख्या तुलनेने विरळ आहे.
(२) भारतातील अतिउत्तरेकडील जम्मू आणि काश्मीर या राज्यात व ब्राझीलमधील अतिउत्तरेकडील अॅमापा राज्यात लोकसंख्या तुलनेने विरळ आहे.
(३) भारतातील मध्य भागातील मध्य प्रदेश राज्यात व ब्राझीलमधील मध्य भागातील माटो ग्रासो राज्यात लोकसंख्या तुलनेने विरळ आहे.
(४) भारताच्या वायव्य भागातील राजस्थान राज्यातील थरच्या वाळवंटात व ब्राझीलमधील वायव्य भागातील अॅमेझोनास राज्यात लोकसंख्या तुलनेने विरळ आहे.
(५) भारतातील पूर्व व पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात आणि ब्राझीलमधील पूर्व किनारपट्टीच्या व प्रामुख्याने आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात लोकसंख्या तुलनेने दाट आढळते.
(आ) लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा सहसंबंध उदाहरणे देऊन स्पष्ट करा.
उत्तर : (१) लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा जवळचा संबंध असतो. अतिपर्जन्य किंवा कमी पर्जन्य असणाऱ्या प्रदेशांत किंवा अतिथंड अथवा अतिउष्ण अशा प्रतिकूल हवामानाच्या प्रदेशांत लोकसंख्येचे विरळ वितरण आढळते.
(२) उदा., भारतातील अतिथंड हिमालयाच्या पर्वतरांगेत, थरच्या वाळवंटी भागात तसेच ब्राझीलमधील अतिपर्जन्य असणाऱ्या अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे विरळ वितरण आढळते.
(३) सौम्य तापमान व पर्जन्याचे मध्यम प्रमाण असलेल्या प्रदेशांत लोकसंख्येचे दाट वितरण आढळते.
(४) उदा., भारतातील सौम्य हवामान व मध्यम पर्जन्य असणाऱ्या गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात तसेच ब्राझीलमधील समशीतोष्ण हवामान असलेल्या आग्नेय किनारपट्टीच्या भागात लोकसंख्येचे दाट वितरण आढळते.
प्रश्न ४. भौगोलिक कारणे लिहा.
(अ) लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे.
उत्तर – (१) कोणत्याही देशाचा आर्थिक व सामाजिक विकास हा देशाची एकूण लोकसंख्या व लोकसंख्येची गुणवत्ता या घटकांवर अवलंबून असतो.
(२) एखादया देशाची लोकसंख्या प्रमाणापेक्षा अधिक असेल व लोकसंख्येची गुणवत्ता निम्न असेल, तर अशा देशाचा आर्थिक व सामाजिक विकास संथ गतीने होतो.
(३) एखाद्या देशात लोकसंख्या पर्याप्त असेल व लोकसंख्येची
गुणवत्ता उच्च असेल, तर अशा देशाचा आर्थिक व सामाजिक विकास जलद गतीने होतो. अशा प्रकारे, लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे.
(आ) ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे.
उत्तर – (१) पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी सुमारे ५.६ टक्के भूभाग ब्राझीलने व्यापला आहे.
(२) याउलट, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ २.७ टक्के लोकसंख्या ब्राझीलमध्ये आढळते.
(३) ब्राझीलमध्ये तुलनेने अधिक भूभाग व तुलनेने कमी लोकसंख्या आहे. त्यामुळे ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे.
(इ) भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे.
उत्तर : (१) पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी केवळ २.४१ टक्के भूभाग भारताने व्यापला आहे.
(२) याउलट, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे १७.५ टक्के लोकसंख्या भारतात आढळते.
(३) भारतात तुलनेने कमी भूभाग व तुलनेने अधिक लोकसंख्या आहे. त्यामुळे भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे.
(ई) ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण विरळ आहे.
उत्तर : (१) ब्राझील देशाच्या उत्तर भागात विषुववृत्ताजवळील अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण सुमारे २००० मिमी असते व या भागातील वार्षिक सरासरी तापमान सुमारे २८ °से असते.
(२) अॅमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या भागात अत्यंत घनदाट सदाहरित वर्षावने आढळतात. जास्त पर्जन्यमान, उष्ण व दमट हवामान आणि घनदाट वर्षावने या प्रतिकूल घटकांमुळे अॅमेझॉन नदीच्या खोऱ्याचा भाग दुर्गम बनला आहे.
(३) अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात वाहतुकीचे दाट जाळे विकसित झालेले नाही. त्यामुळे अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या विरळ आहे.
(उ) गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचेवितरण दाट आहे.
उत्तर : (१) भारतातील उत्तर भागात गंगा नदीच्या खोऱ्याचा मैदानी प्रदेश आहे.
(२) गंगा नदीच्या खोऱ्यात पुरेसे पर्जन्यमान, सुपीक जमीन, पाण्याची उपलब्धता, सौम्य हवामान इत्यादी अनुकूल घटक आढळतात.
(३) गंगा खोऱ्याचा प्रदेश शेती व विविध उद्योगांच्या विकासासाठी अनुकूल आहे. या प्रदेशात वाहतुकीचे दाट जाळे विकसित झालेले आहे. त्यामुळे गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्या दाट आहे.
प्रश्न ५. (अ) एक चौकिमी क्षेत्र दर्शवणाऱ्या ‘अ’ व ‘आ’ चौकोनांमधील लोकसंख्येच्या घनतेची तुलना करून वर्गवारी करा.
उत्तर – (१) एक चौकिमी क्षेत्र दर्शवणाऱ्या ‘अ’ या चौकोनामधील लोकसंख्येची घनता : ७०० प्रति चौ. किमी (१ चिन्ह = १०० व्यक्ती) (२) एक चौकिमी क्षेत्र दर्शवणाऱ्या ‘आ’ या चौकोनामधील लोकसंख्येची घनता : १८०० प्रति चौ. किमी
(१ चिन्ह = १०० व्यक्ती)
(३) ‘अ’ या चौकोनातील लोकसंख्येची घनता तुलनेने कमी आणि ‘आ’ या चौकोनातील लोकसंख्येची घनता तुलनेने जास्त आहे.
(आ) आकृती ‘आ’ मधील एक चिन्ह = १०० व्यक्ती असेप्रमाण असल्यास स्त्री-पुरुष प्रमाण सांगा.
उत्तर : आकृती ‘आ मधील १ चिन्ह = १०० व्यक्ती असे प्रमाण असल्यास स्त्री-पुरुष प्रमाण पुढीलप्रमाणे आहे :
स्त्रियांचे प्रमाण : १००० व
पुरुषांचे प्रमाण ८००.
(लिंग गुणोत्तर १२५७)
प्रश्न ६. आकृती ६.१ ‘आ’ मधील लोकसंख्येच्या घनतेविषयी भाष्य करा.
उत्तर : (१) प्राकृतिक रचना व हवामान यांचा भारतातील लोकसंख्या वितरणावर मोठा प्रभाव पडतो.
(२) भारतातील अतिउंच पर्वतीय प्रदेशात, पर्जन्याचे प्रमाण अत्यंत कमी असणाऱ्या वाळवंटी प्रदेशात व दुर्गम भागात लोकसंख्येचे विरळ वितरण (कमी घनता) आढळते.
(३) उदा., भारतातील अतिउंचावरील हिमालयाच्या पर्वतरांगांमधील अतिथंड हवामानाच्या प्रदेशात, राजस्थानमधील थरच्या वाळवंटी प्रदेशात, मध्य प्रदेश व छत्तीसगढ राज्यांतील कमी पावसाच्या प्रदेशात लोकसंख्येचे विरळ वितरण (कमी घनता) आढळते.
(४) भारतातील मध्यम पावसाच्या प्रदेशात, मैदानी प्रदेशात व तुलनेने सौम्य हवामान असलेल्या प्रदेशात लोकसंख्येचे दाट वितरण (जास्त घनता) आढळते.
६. लोकसंख्या
*****