६. वस्तू कविता स्वाध्याय मराठी इयत्ता दहावी, Vastu Kavita Question and answers

६. वस्तू

वस्तू कविता स्वाध्याय मराठी इयत्ता दहावी

Vastu poem full questions & answers

(१) आकृत्या पूर्ण करा.

(अ)

वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये

(आ)

वस्तूंजवळ माणसांसारख्या नसणाऱ्या गोष्टी

(२) कारणे लिहा.

(अ) वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत, कारण…………

उत्तर: वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत, कारण नंतरच्या काळातही त्या आपला स्नेह जिवंत ठेवणार आहेत.

(आ) वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही, कारण…………

उत्तर: वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही, कारण त्यांचे आयुष्य संपते.

(३) काव्यसौंदर्य.

(अ) कवितेतील खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात.

उत्तर:आशयसौंदर्य :

‘वस्तू’ या कवितेत कवी द. भा. धामणस्कर यांनी निर्जीव वस्तूंनाही सजीव प्राणिमात्रांसारख्या भावना असतात, त्या संवेदनशील असतात, हे बिंबवले आहे. तसेच वस्तूंना सहानुभूतीने समजून घ्यायला हवे व त्यांना प्रेमाने वागवायला हवे, असे प्रतिपादन केले आहे.

काव्यसौंदर्य :

बहुतेक माणसे वस्तूंना निर्जीव समजतात व त्यांच्याशी निर्दयतेने वागतात. त्यांना कसेही हाताळतात. माणसांच्या या कठोर कृत्यावर भाष्य करताना वरील ओळींत कवी म्हणतात की कदाचित वस्तूंना जीव नसेलही आणि मनही नसेल, म्हणून त्यांना आपण कठोरपणे वागवावे का? वस्तूंना मन आहे, असे समजून जर त्यांच्याशी आपण चांगले वर्तन केले तर वस्तूंना खूप आनंद होतो. त्या सुखावतात. आपल्या कुटुंबातील त्या घटक आहेत, अशी आपुलकी आपण दाखवली तर वस्तूही आपल्याला प्रेम व माया देतील.

भाषिक सौंदर्य :

मुक्तशैलीतल्या  या रचनेमुळे कवींनी या ओळींतून रसिकांशी थेट संवाद साधला आहे. अगदी साध्या पण आवाहक शब्दांत मोठे तत्त्व बिंबवले आहे. वस्तू व माणूस यांतील स्नेहबंध आत्मीयतेने जपायला हवा, हा संदेश अगदी हळूवार पद्धतीने कवींनी दिला आहे.

(आ) ‘वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची’ याबाबतचा तुमचा दृष्टिकोन सांगा.

उत्तर: द. भा. धामणस्कर यांनी ‘वस्तू’ या कवितेमध्ये वस्तूंना कसे हाताळावे व जोपासावे याचा वस्तुपाठ देताना वस्तूंचे मानवीकरण केले आहे.

बरीच माणसे वस्तूंना सजीव समजत नाहीत. त्यांनाही भावना असू शकतात, हे लक्षात घेत नाहीत. कवी म्हणतात की, त्यांनाही जीव आहे, मन आहे, असे आपण समजून त्यांच्याशी वागलो, तर वस्तूंना परमानंद होतो. वस्तूंना कसेही हाताळू नये. त्यांना एखादया लहान मुलांसारखे लाडावून मायेने हाताळावे. हाताळताना आपले अस्वच्छ हात लावू नयेत. कारण वस्तूंनाही स्वच्छतेची आवड असते. महात्मा गांधींचे वचन आहे की स्वच्छता हा परमेश्वर आहे, म्हणून केवळ माणसाने स्वच्छ राहावे असे नाही. आपण ज्या वस्तू वापरतो, त्यांनाही स्वच्छ राखता आले पाहिजे.

‘वस्तूंना असते आवड स्वच्छ राहण्याची’ या ओळीतून माणसाला वस्तू हाताळण्याचा निकोप दृष्टिकोन दिलेला आहे.

(इ) एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची फजिती कशी झाली, याचे वर्णन करा.

उत्तर:माझे दप्तर खूप छान आहे. मला ते खूप आवडते. पाठीवर त्याला घेऊन शाळेत मिरवत मिरवत जाण्यात एक वेगळा आनंद आहे. मी माझ्या दप्तराचे खूप लाड करतो. त्याला दर रविवारी धुतो, स्वच्छ करतो. पण एकदा काय झाले! गृहपाठ खूप असल्यामुळे माझ्या दप्तरात मी सर्व पुस्तके, वह्या कोंबल्या. त्यात खाऊचा डबा व पाण्याची बाटली ठेवली; त्यामुळे दप्तर जड झाले व फुगले होते. तसेच ते मी पाठीवर मारून रस्त्याने ऐटीत चालू लागलो. थोड्या वेळाने कोपऱ्यात ते फाटले व त्यातून बऱ्याच वस्तू हळूहळू टपटपत खाली पडल्या. दहा-बारा पावले पुढे गेल्यावर मला कळले. मी परत फिरलो नि पुस्तके-वह्या गोळा करीत मागे आलो. रस्त्यावरची मंडळी मला हसत होती. माझी फजिती झाली. पण त्यातून मी धडा शिकलो की दप्तर असले म्हणून काय झाले? त्यालाही जीव आहे. किती पेलणार ते ओझे! मी दप्तराची क्षमा मागितली व पुन्हा असे होणार नाही, याची दक्षता घेतली. दप्तरावरचे माझे प्रेम खूप वाढले.

(ई) तुमचा वर्गमित्र वर्गखोली/शालेय परिसरातील वस्तूचे नुकसान करत आहे, या प्रसंगी तुम्ही काय कराल ते सांगा.

उत्तर:आमच्या शाळेच्या गेटपासून शाळेच्या मुख्य इमारतीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा फुलझाडांच्या कुंड्या रांगेने लावलेल्या आहेत. माझा मित्र रमेश खूप खोडसाळ आहे. एकदा शाळेत शिरताना त्याने मुद्दाम एका कुंडीला लाथ मारून खाली पाडली. आतील फुलरोपासहित माती विखुरली गेली. मी सोबतच होतो. मी त्याला या कृत्याबद्दल विचारले तेव्हा ते चुकून झाले असे सांगितले. पण मला माहीत होते, त्याने ते मुद्दामहून केले आहे. मी त्याला समजावले ‘ठीक आहे. तू चुकून लाथ लागली म्हणतोस ना! मग आता आपण ती नीट उचलून ठेवू ।’ तो मानेना. तो पुढे जाऊ लागला तेव्हा मी त्याला या कुंड्या शाळेने फक्त शोभेसाठी लावलेल्या नाहीत. विदयार्थ्यांना शाळेत येताना प्रसन्न वाटावे, हाही त्यामध्ये चांगला हेतू आहे. तसेच शास्त्रात आपण शिकलो की दिवसा झाडे प्राणवायू सोडतात व कार्बन डायऑक्साइड घेतात. हा प्राणवायू आपल्याला मिळतो. शिवाय फुलांचे विविध रंग आपल्या डोळ्यांना सुखावतात – असे समजावून सांगितले. तो मला ‘सॉरी’ म्हणाला व निमूटपणे आम्ही दोघांनी कुंडी जशी होती तशी करून ठेवली.

बालसाहित्यिका-गिरिजा कीर (स्थूलवाचन १)

Print Friendly, PDF & Email
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.