९. पर्यटन, वाहतूक व संदेशवहन
प्रश्न १. चूक की बरोबर ते सकारण सांगा.
(अ) भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे.
उत्तर : बरोबर..
कारण : भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे भारतातील विविध भागांतील व परदेशांतील अनेक पर्यटक भारतात पर्यटनासाठी येतात व त्यामुळे पर्यटन व्यवसायाच्या व पर्यटन व्यवसायाशी संबंधित इतर अनेक व्यवसायांच्या विकासास चालना मिळते..
(आ) पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे.
उत्तर : बरोबर.
कारण पर्यटन हा तृतीयक स्वरूपाचा व्यवसाय आहे. पर्यटन व्यवसायात दृश्य स्वरूपातील वस्तूंची खरेदी-विक्री न होता अदृश्य स्वरूपातील सेवांची खरेदी-विक्री होते.
(इ) देशातील वाहतूक मार्गांचा विकास हा देशाच्या विकासाचा एक निर्देशांक आहे.
उत्तर : बरोबर.
कारण: देशाचा विकास अधिक असल्यास देशात वाहतूक मार्गांचे दाट, विकसित व कार्यक्षम जाळे आढळते. याउलट, देशाचा विकास कमी असल्यास देशात वाहतूक मार्गांचे विरळ, अविकसित व अकार्यक्षम जाळे आढळते. म्हणजेच, एखादया देशातील वाहतूक मार्गांच्या विकासावरून त्या देशाच्या विकासाचा अंदाज बांधता येतो.
(ई) ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या पुढे आहे.
उत्तर : चूक.
कारण : ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या ८ तास ३० मिनिटे मागे आहे. भारत आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पूर्वेकडे आहे व भारताची प्रमाणवेळ ही ग्रीनिच वेळेच्या ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. ब्राझील आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेकडे आहे व ब्राझीलची अधिकृत प्रमाणवेळ ग्रीनिच वेळेच्या ३ तास मागे आहे.
(उ) भारतात पर्यटन व्यवसायाचा विकास नव्यानेच सुरू झाला आहे.
उत्तर : बरोबर.
कारण : भारतात फार पूर्वीपासून पर्यटन व्यवसायात लोक गुंतलेले असूनही आधुनिक काळात पर्यटन व्यवसायाकडे नव्याने व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. सदयःस्थितीत विविध पर्यटन प्रकार, पर्यटकांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा इत्यादी बाबतींत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.
प्रश्न २. थोडक्यात उत्तरे लिहा.
(अ) ब्राझीलमधील कोणते घटक पर्यटकांना अधिक आकर्षित करतात?
उत्तर : ब्राझीलमधील पुढील घटक पर्यटकांना अधिक आकर्षित करतात
(१) पांढऱ्याशुभ्र वाळूच्या पुळणी.
(२) निसर्गरम्य व स्वच्छ सागरी किनारे.
(३) निसर्गरम्य बेटे.
(४) अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यातील सदाहरित घनदाट वर्षावने.
(५) विविध प्रजातींचे प्राणी व पक्षी.
(६) उदयाने इत्यादी.
(आ) ब्राझीलच्या अंतर्गत भागात लोहमार्गांच्या विकासात कोणत्या अडचणी आहेत?
उत्तर : ब्राझीलच्या अंतर्गत भागात लोहमार्गांच्या विकासात पुढील अडचणी आहेत :
(१) अॅमेझॉन नदीचे खोरे..
(२) अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यातील सदाहरित घनदाट वर्षावनांनी व्यापलेला दुर्गम प्रदेश..
(३) ब्राझीलच्या उच्चभूमीमुळे निर्माण झालेला प्रदेशांचा उंचसखलपणा.
(४) ब्राझीलमधील दलदलीचा प्रदेश इत्यादी.
(इ) कोणत्या साधनांमुळे संदेशवहन अतिशय गतिमान झाले आहे?
उत्तर : (१) दूरध्वनी, भ्रमणध्वनी, संगणक, इंटरनेट इत्यादी साधनांमुळे संदेशवहन अतिशय गतिमान झाले आहे.
(२) दूरदर्शन, आकाशवाणी इत्यादी जनसंपर्काच्या साधनांमुळेही संदेशवहन अतिशय गतिमान झाले आहे.
प्रश्न ३. खालील आकृतीमध्ये ब्राझिलियातून ३१ डिसेंबरच्या सकाळी ११ वाजता विमान निघाले आहे. हे विमान ०° रेखावृत्त ओलांडून नवी दिल्लीमार्गे व्लॉदिवोस्टॉक क या ठिकाणी जाणार आहे. ज्यावेळेस विमान निघाले
त्यावेळेस नवी दिल्ली आणि व्लॉदिवोस्टॉक येथील स्थानिक वेळ, दिवस व तारीख काय असेल ते सांगा.
उत्तर : ब्राझीलियातून ३१ डिसेंबरच्या सकाळी ११ वाजता विमान निघाले असताना त्या वेळी नवी दिल्ली आणि ब्लॉदिवोस्टॉक येथील स्थानिकवेळ, दिवस व तारीख पुढीलप्रमाणे असेल :
शहर | स्थानिक वेळ | दिवस | तारीख |
ब्राझीलिया | सकाळचे ११.०० | सोमवार | ३१ डिसेंबर |
दिल्ली | संध्याकाळचे ७.३० | सोमवार | १ जानेवारी |
ब्लॉदिवोस्टॉक | पहाटेचा १.०० | मंगळवार | २ जानेवारी |
प्रश्न ४. योग्य जोड्या जुळवा.
‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) ट्रान्स ॲमेझोनियन मार्ग. (i) पर्यटन स्थळ
(आ) रस्ते वाहतूक. (ii) भारतातील रेल्वेस्थानक
(इ) रिओ दी जनेरीओ. (iii) सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग
(ई) मनमाड. (iv) प्रमुख रस्ते मार्ग
(v) ४०° पश्चिम रेखावृत्त
उत्तरे :
(१) ट्रान्स अॅमेझॉलियन मार्ग – प्रमुख रस्ते मार्ग
(२) रस्ते वाहतूक – सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग
(३) रिओ दी जनेरिओ – पर्यटन स्थळ
(४) मनमाड – भारतातील रेल्वे स्थानक
प्रश्न ५. भौगोलिक कारणे लिहा.
(अ) ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे.
उत्तर : (१) पांढऱ्याशुभ्र वाळूच्या पुळणी, स्वच्छ सागरी किनारे, निसर्गरम्य बेटे, अॅमेझॉन नदीखोऱ्यातील सदाहरित घनदाट अरण्ये, प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या विविध प्रजाती, विविध उदयाने इत्यादी आकर्षणांमुळे ब्राझीलमधील पर्यटन व्यवसायाचा जलद गतीने विकास होत आहे.
(२) पर्यटन व्यवसायातील वाढीमुळे निर्माण होणारे प्रदूषण,पर्यावरणास होणारी हानी इत्यादी दुष्परिणाम रोखणे अत्यावश्यक आहे. (३) पर्यावरणस्नेही पर्यटनाच्या विकासाने पर्यटन व्यवसायास अधिक चालना देणे व पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवणे शक्य होणार आहे. म्हणून, ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे.
(आ) ब्राझीलमध्ये जलमार्गांचा विकास झालेला नाही.
उत्तर : (१) ब्राझीलमधील बहुतांश नद्यांतील विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे.
(२) ब्राझीलमधील बहुतांश नदयांतील विसर्गाचा वेग जास्त आहे..
(३) ब्राझीलमधील नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशात उंचसखल भूभाग आहेत. त्यामुळे हे प्रदेश दुर्गम बनले आहेत. म्हणून, ब्राझीलमध्ये (अंतर्गत) जलमार्गांचा विकास झालेला नाही.
(इ) उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गांचे जाळे विकसित झाले आहे.
उत्तर : (१) उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा सखल प्रदेश आहे. या प्रदेशात लोकसंख्येचे दाट वितरण आढळते.
(२) उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात शेती व विविध उद्योग भरभराटीस आले आहेत.
(३) या प्रदेशात वस्तूंची ने-आण करण्यासाठी व प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीच्या साधनांची मागणी असते. म्हणून, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गांचे जाळे विकसित झालेले आहे.
(ई) देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गांचा विकास उपयुक्त ठरताे.
उत्तर : (१) वाहतूक मार्गांचा वापर करून वस्तूंची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने-आण करता येते. वाहतूक मार्गांचा वापर करून देशातील लोकांची गतिशीलता वाढते.
(२) वाहतूक मार्गाच्या आधारे देशातील शेती, खाणकाम, मासेमारी, कारखानदारी, पर्यटन, बँका इत्यादी अनेक प्रकारच्या व्यवसायांस चालना मिळते.
(३) वाहतूक मार्गाच्या विकासामुळे देशांतर्गत व्यापारास व आंतरराष्ट्रीय व्यापारास मोठ्या प्रमाणावर चालना मिळते, रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात, देशाचे उत्पन्न वाढते. म्हणून, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गांचा विकास उपयुक्त ठरतो.
(उ) आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गांवर अवलंबून राहावे लागते.
उत्तर : (१) जलमार्ग हा वाहतुकीचा सर्वांत स्वस्त मार्ग आहे. त्याचप्रमाणे, जलवाहतुकीत वाहतूक क्षमता तुलनेने अधिक असते.
(२) आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठ्या प्रमाणावर वस्तूंची आयात व निर्यात केली जाते.
(३) आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गांचा वापर केला असता, कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर वस्तूंची आयात व निर्यात करता येते. म्हणून, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गांवर अवलंबून राहावे लागते.
प्रश्न ६. फरक स्पष्ट करा.
(१) अॅमेझॉन नदीतील जलवाहतूक आणि गंगा नदीतील जलवाहतूक.
उत्तर –
अॅमेझॉन नदीतील जलवाहतूक | गंगा नदीतील जलवाहतूक |
(१) अॅमेझॉन नदीतूनप्रा मुख्याने व्यापारी तत्त्वावर आंतरराष्ट्रीय जलवाहतूक केली जाते.(२) अॅमेझॉन नदीतून केल्या जाणाऱ्या जलवाहतुकीचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. | (१) गंगा नदीतून प्रामुख्याने अंतर्गत जलवाहतूक केली जाते. (२) गंगा नदीतून केल्या जाणाऱ्या जलवाहतुकीचे प्रमाण तुलनेने कमी आहे. |
(आ) ब्राझीलमधील संदेशवहन व भारतामधील संदेशवहन
उत्तर :
ब्राझीलमधील संदेशवहन | भारतातील संदेशवहन |
(१) ब्राझीलमधील संदेशवहन तुलनेने अधिक विकसित व अधिक कार्यक्षम आहे. (२) ब्राझीलमधील सुमारे ४५% पेक्षा अधिक लोकसंख्या संदेशवहनासाठी इंटरनेटचा वापर करीत आहे. | (१) भारतामधील संदेशवहन तुलनेने कमी विकसित व कमी कार्यक्षम आहे. (२) भारतात इंटरनेट वापरणाऱ्या लोकांची एकूण संख्या ही जगात सर्वाधिक असली, तरी भारतातील केवळ सुमारे ३०% लोकसंख्या संदेश वहनासाठी इंटरनेटचा वापर करते. |
(इ) भारतीय प्रमाणवेळ व ब्राझीलची प्रमाणवेळ
उत्तर :
भारतीय प्रमाणवेळ | ब्राझीलची प्रमाणवेळ |
(१) भारतीय प्रमाणवेळ ही जागतिक प्रमाणवेळेच्या ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. (२) भारतीय ब्राझीलच्या प्रमाणवेळेच्या ८ तास ३० मिनिटे पुढे आहे. (३) भारतामध्ये एकच प्रमाणवेळ मानली जाते. (४) भारतातील अतिपूर्वेकडील अतिपश्चिमेकडील रेखावृत्तांतील वेळांतील फरक सुमारे १२० मिनिटांचा आहे. ब्राझीलची प्रमाणवेळ | (१) ब्राझीलची (अधिकृत) प्रमाणवेळ ही जागतिक प्रमाणवेळेच्या ३ तास मागे आहे. (२) ब्राझीलची प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळेच्या ८ तास ३० मिनिटे मागे आहे. (३) ब्राझीलमध्ये एकूण चार प्रमाणवेळा मानल्या जातात. (४) ब्राझीलमधील अतिपश्चिमे कडील आणि अतिपूर्वे कडील रेखावृत्तांतील वेळांतील फरक सुमारे १६८ मिनिटांचा आहे. |
प्रश्न ७. टिपा लिहा.
(अ) आधुनिक संदेशवहन.
उत्तर : (१) माहिती तंत्रज्ञान आणि संदेशवहनाच्या युगात संगणक, भ्रमणध्वनी, इंटरनेट, कृत्रिम उपग्रह इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या आधारे संदेशवहन केले जाते.
(२) आधुनिक संदेशवहन हे तुलनेने कमी खर्चीक व अधिक परिणामकारक असते.
(३) भारतात दूरसंचार उद्योग हे अतिवेगाने वाढणारे क्षेत्र आहे. भारत हा सर्वाधिक स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरणाऱ्यांचा देश म्हणून ओळखला जातो.
(४) स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे तयार केलेले उपग्रह व उपग्रह प्रक्षेपण तंत्र यांच्या वापरामुळे दूरसंचार (संदेशवहन) क्षेत्रात भारताचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे.
(आ) भारतातील हवाई वाहतूक
उत्तर : (१) ब्राझीलच्या तुलेनत भारतातील आंतरराष्ट्रीय वाहतुकीचा अधिक प्रमाणात विकास झाल्याचे आढळते. (२) भारतात आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांबरोबरच अंतर्गत हवाई मार्गाच्या वापरात वाढ होत आहे.
(३) भारतातील महत्त्वाची शहरे एकमेकांना अंतर्गत हवाई मार्गांनी जोडली गेली आहेत. त्याचप्रमाणे भारतातील महत्त्वाची शहरे जगातील इतर देशांतील महत्त्वाच्या शहरांशी आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांनी जोडली गेली आहेत.
(४) मुंबई, पुणे, चेन्नई, बेंगळुरू, दिल्ली, कोलकाता, विशाखापट्टणम इत्यादी शहरांत भारतातील प्रमुख विमानतळ आहेत.
(इ) प्राकृतिक रचना आणि अंतर्गत जलवाहतूक
उत्तर : (१) प्राकृतिक रचना आणि अंतर्गत जलवाहतूक यांचा खूप जवळचा संबंध दिसून येतो.
(२) प्रदेशांचा उंचसखलपणा, नदयांची, खाड्यांची किंवा तलावांची अरुंद पात्रे, नदयांतील किंवा खाड्यांतील पाण्याचा जलद वेग, नदयांच्या पात्रांत उंचसखल भूभागामुळे तयार झालेले धबधबे, नद्यांना येणारे पूर इत्यादी घटकांमुळे अंतर्गत जलवाहतुकीत अडथळे निर्माण होतात.
(३) सखल प्रदेश, नद्यांची, खाड्यांची किंवा तलावांची रुंद पात्रे, नदयांतील किंवा खाड्यांतील पाण्याचा संथ वेग इत्यादी घटकांमुळे अंतर्गत जलवाहतूक मोठ्या प्रमाणावर विकसित होते.
(४) भारतातील महत्त्वाच्या नद्यांमधून अंतर्गत जलवाहतूक केली जाते. भारतातील एकूण वाहतूक मार्गात जलमार्गांचा वाटा केवळ १ टक्का आहे.
(ई) प्रमाणवेळेची उपयोगिता
उत्तर : (१) एखादया देशाचा रेखावृत्तीय विस्तार अधिक असेल, तर देशाच्या पूर्व व पश्चिम भागांतील वेळेत फरक पडू शकतो. अशा वेळी त्या देशात प्रमाणवेळेचे महत्त्व अधिक असते.
(२) सर्वसाधारणपणे, देशाच्या प्रमाणवेळेप्रमाणेच देशातील सर्व भागांतील स्थानिक वेळा निश्चित केल्या जातात.
(३) प्रमाणवेळेचा वापर करून देशांतर्गत रेल्वे वाहतुकीच्या व हवाई वाहतुकीच्या वेळापत्रकांत सुसूत्रता आणता येते.
(४) प्रमाणवेळेचा वापर करून देशातील विविध भागांतील बँका, शाळा व महाविदयालये, विविध बाजारपेठा, इस्पितळे इत्यादी ठिकाणच्या कामकाजांत सुसूत्रता आणता येते.
९. पर्यटन, वाहतूक व संदेशवहन
*****